रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरी कृती दलाची स्थापना ! – जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा
-
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव
-
जिल्हा रुग्णालयात आता ११ संशयित रुग्ण
रत्नागिरी – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जिल्ह्यातील सर्व शहरांमध्ये नागरी कृती दलाची स्थापना केली आहे. रत्नागिरी शहरातील प्रभागाचे नगरसेवक या दलाचे अध्यक्ष असतील. तसेच नगर परिषदेतील वसुली लिपिक, स्वच्छता निरीक्षक, एएन्एम् किंवा आशा, पाणीपुरवठा विभागाचा कर्मचारी या दलाचे सदस्य आहेत.
या दलाने प्रतिदिन आपपल्या क्षेत्रातील घरांची पाहणी करून करोना विषाणूची लक्षणे असलेले रुग्ण शोधायचे आहेत आणि परदेशातून आलेल्या व्यक्ती शोधून त्यांच्या घरातील सदस्यांना सुरक्षित ठेवण्यासंबंधी आवश्यक जनजागृती करायची आहे आणि या कामाचा सर्व अहवाल मुख्याधिकार्यांना प्रतिदिन द्यायचा आहे.
जिल्हा रुग्णालयात आता ११ संशयित रुग्ण
कोरोना विषाणूविषयी जिल्हा शासकीय रुग्णालयात आता ११ संशयित उरले आहेत. ५२ संशयितांना आतापर्यंत उपचारानंतर घरी पाठवण्यात आले आहे; मात्र त्यांना घरीच ‘क्वारंन्टाईन’ करून ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व विलगीकरण केंद्रांमध्ये एकूण ६३९ जण असल्याचे आरोग्ययंत्रणेकडून सांगण्यात आले आहे.
गुहागर तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या ६ जणांची होणार चाचणी
गुहागर शहरात जर्मनीतून आलेल्या युवतीला ‘होम क्वॉरटाईन’ करून ठेवण्यात आले आहे. या युवतीची चाचणी होणार आहे. शृंगारतळी परिसर ‘आयसोलेट’ केल्यानंतर येथील लोकांना जीवनावश्यक आणि किराणा वस्तू खरेदी करता याव्यात, यासाठी शृंगारतळी मधील काही दुकाने वरिष्ठांच्या आदेशाने उघडण्यात येणार आहेत; मात्र ग्रामस्थांनी गर्दी करू नये, असे आदेश प्रशासनाने दिले आहेत. कोकणातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण गुहागर तालुक्यातील शृंगारतळी येथे सापडला होता, त्या कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ६ जणांचीही कोरोना चाचणी होणार असल्याची माहिती तहसीलदार धोत्रे यांनी दिली आहे.
विदेशातून आलेल्या ३२ ग्रामस्थांना घरातच केले विलग
गुहागर तालुक्यात १० देशांतून मूळ गावी परतलेल्या ३२ ग्रामस्थांना घरातच विलग करून ठेवण्यात आले आहे. तर ६ जणांना रुग्णालयात ठेवण्यात आले आहे. कोरोनाबाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या १८ जणांपैकी १४ जण घरात, तर ४ जणांना रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. अशी एकूण देखरेखीखाली ठेवणार्या ग्रामस्थांची संख्या ५६ वर पोचली आहेत.
देवरुख शहरात रांगेत उभे राहून खरेदी
दळणवळण बंदीच्या काळात देवरुख शहरात अत्यावश्यक सेवा वगळता बाकी व्यवहार ठप्प आहेत. नागरिक भाजीपाला आणि किराणा माल घेण्यासाठी बाजारात येतांना दिसत आहेत. ५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र येऊ नयेत, यासाठी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भाजी व्यापारी बाळासाहेब ढवळे यांनी भाजी दुकानासमोर ५ चौकोन आखले आणि ‘नागरिकांनी रांगेत या चौकोनात येवूनच भाजी खरेदी करावी’, असे आवाहन केले आहे. यामुळे गर्दी न होता भाजी विक्री सुरळीत होत असल्याचे पहायला मिळत आहे.