अयोध्येत तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात रामललाची स्थापना
अयोध्या (उत्तरप्रदेश) – गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर अयोध्येतील रामजन्मभूमीवर तब्बल २७ वर्षे एका तंबूमध्ये असणार्या रामललाला येथून जवळच एका तात्पुरत्या ‘बुलेटप्रुफ’ मंदिरात विधीवत् स्थापित करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पहाटे मंत्रोच्चाराच्या घोषात येथे विधीवत पूजा करून चांदीच्या सिंहासनावर रामललाची स्थापना केली.
हे मंदिर फायबरचे असून २४ फूट बाय १७ फूट वर्ग एवढा त्याचा आकार आहे. मंदिराची उंची १९ फूट आहे. मंदिराच्या ३ बाजूंनी काचा लावण्यात आल्या आहेत. येथे चारही दिशेने लोखंडी जाळीचे सुरक्षाकवच बनवण्यात आले आहे. येथे दर्शनासाठी येणार्या भाविकांना दर्शन घेण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेचे पालन करावे लागणार आहे.