देशभरात घरून काम केले जात असल्यामुळे मंदावला इंटरनेटचा वेग !
अनेक जण ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळत असल्याचे उघड
घरून काम करण्याचे प्राधान्य अग्रक्रमात असतांना सरकारने ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ यांवर बंदी आणून कामे पूर्ण होण्यासाठी इंटरनेटला गती उपलब्ध करून द्यावी, हीच राष्ट्रप्रेमींची अपेक्षा !
नवी देहली – देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने दळणवळण बंदी घोषित करण्याआधीपासूनच अनेक खासगी आस्थापनांनी त्यांच्या कर्मचार्यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. ते करण्यासाठी इंटरनेट आवश्यक आहे. घरून काम करत असतांना इंटरनेटची गती न्यून होत असल्याचे समोर आले आहे. काही काम नसल्यामुळे अनेक जण घरामध्ये ‘ऑनलाइन वेबसीरिज्’ आणि ‘ऑनलाइन’ खेळ खेळण्याचा आनंद घेत आहेत. त्यामुळे इंटरनेटवरील ताण वाढून त्याची गती मंदावली आहे. सध्या केवळ भारतातच नाही, तर अनेक देश इंटरनेटची गती न्यून होण्याच्या समस्येचा सामना करत आहेत.
एका संशोधन संस्थेने केलेल्या संशोधनानुसार, ‘मार्च मासाच्या प्रारंभीच्या आठवड्यात भारतात केबलच्या माध्यमातून असलेल्या ब्रॉडबँडच्या ‘डाऊनलोडींग’ची गती चांगली होती, तर भ्रमणभाषद्वारे चालणार्या इंटरनेटची गती न्यून होती.’ त्यामुळे ‘सेल्यूलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ने ‘नेटफ्लिक्स’सारख्या ‘व्हिडिओ स्ट्रिमिंग’ करणार्या आस्थापनांना सांगितले आहे की, काही दिवस एच्.डी. (हाय डेफिनेशन) गुणवत्तेचे व्हिडिओ दाखवणे बंद करून एस्.डी. (स्टँडर्ड डेफिनेशन) व्हिडिओ दाखवावेत.