कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सार्वजनिक ठिकाणांची महापालिकेकडून निर्जंतुकीकरणासह अन्य उपाययोजना
नवी मुंबई, २४ मार्च (वार्ता.) – कोरोनाच्या प्रतिबंधासाठी महानगरपालिकेकडून सार्वजनिक ठिकाणांचे निर्जंतुकीकरण करण्यासह अन्य उपाययोजना करण्यात येत आहेत. या अनुषंगाने घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने रात्री रेल्वेस्थानकाचा परिसर, बसस्थानके मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असणारी ठिकाणे यांचे अत्याधुनिक जेटींग यंत्राद्वारे सोडियम हायपोक्लोराईडसारखे जंतूनाशक फवारून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे महानगरपालिका क्षेत्रातील ९२ गटांतील साफसफाई कंत्राटदारांच्या वतीने सर्व स्वच्छता कामगारांना मास्क आणि हातमोजे यांसारख्या सुरक्षा साधनांचे वितरण करण्यात आले आहे. त्यांचा न चुकता वापर करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे कामगारांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक कर्मचार्यांच्या गटाला ५ लिटर सॅनिटायझर वाटण्यात आले आहे.
याशिवाय मुख्यालयासह महानगरपालिकेच्या प्रत्येक कार्यालयात एक आठवडा आधीपासून सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा वापर केला जात आहे. त्याचप्रमाणे कोरोना विषाणू हा भूमीवर टिकून रहातो. हे लक्षात घेऊन यासाठी सुरक्षेची उपाययोजना करण्यात आली आहे. यामध्ये महापालिका मुख्यालयासह सर्व कार्यालयांच्या प्रवेशद्वारांजवळ जंतूरोधक औषधाचे मिश्रण असलेले पाण्याचे टब ठेवण्यात आले आहेत. कार्यालयात प्रवेश करतांना प्रत्येकाने पादत्राणांसह पाय त्यात मिश्रणात बुडवून, पायपुसणीवर स्वच्छ करून कार्यालयात प्रवेश करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे आणि त्याचे तंतोतंत पालन केले जात आहे.
कोरोनाविरोधातील लढाईसाठी महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत असून नागरिकांनी त्यांच्या घरातच थांबून संसर्गाद्वारे पसरणार्या या आजाराची साखळी खंडित करण्यात आपले योगदान द्यावे. त्याचप्रमाणे आपल्या स्वत:च्या आणि इतरांच्या आरोग्याचे रक्षण करावे, असे आवाहन महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी केले आहे.