श्री दासबोध नित्यपाठ म्हणजे श्री समर्थ उपदेशाचे जणू नवनीतच ! – रमणलाल शहा, ज्येष्ठ ज्योतिर्विद
सातारा, २४ मार्च (वार्ता.) – श्री समर्थ रामदासस्वामी यांनी १७ व्या शतकात ‘ग्रंथराज दासबोध’ची निर्मिती केली. या ग्रंथाच्या माध्यमातून श्री समर्थांनी कालातीत असलेला पारमार्थिक आणि प्रापंचिक उपदेश केला आहे. आताच नाही भविष्यातही शेकडो वर्षे दासबोध ग्रंथोपदेश साधकांना मार्गदर्शक ठरणार आहे. ग्रंथराज दासबोधमध्ये ७ सहस्र ८०० ओव्या असल्याने त्यातून आवश्यक मार्गदर्शन शोधणे तसे अवघड आहे. याचाच विचार करून समर्थभक्त अरुण गोडबोले यांनी अतिशय अभ्यासपूर्वक त्याचे सार काढून ते प्रतिदिन वाचण्यासाठी एक पान अशा ३६५ पानांत लिहून हा ग्रंथ सिद्ध केला आहे. श्री दासबोध नित्यपाठ म्हणजे श्री समर्थ उपदेशाचे जणू नवनीतच आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि साहित्यिक प्राचार्य रमणलाल शहा यांनी काढले. अरुण गोडबोले लिखित ‘श्री दासबोध नित्यपाठ’ या ग्रंथाच्या ५ व्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते.
या वेळी मनोगत व्यक्त करतांना अरुण गोडबोले म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रकाशन सोहळ्याचा कार्यक्रम जाहीरपणे घेता आला नाही. त्यामुळे समस्त समर्थभक्तांना या कार्यक्रमाला मुकावे लागले. ग्रंथराज दासबोधाचा दीर्घकाळ अभ्यास करून हा ग्रंथ लिहिता आला, ही श्री समर्थ कृपाच आहे. अभ्यासक आणि वाचक यांच्या प्रतिसादामुळे ४ थी आवृत्ती संपून बराच काळ झाला; मात्र मागणी येतच होती. त्यामुळे ५ वी आवृत्ती प्रकाशित करावी लागली. मुद्रणाचा व्यय वाढला असला, तरी यामागील प्रेरणा लक्षात घेऊन या आवृत्तीचे मूल्य ४०५ रुपये ठेवावे लागले. वाचकांनी तेवढी रक्कम पाठवल्यास त्यांना त्याच मूल्यात ग्रंथ घरपोच पाठवला जाणार आहे. भाविकांनी भ्रमणभाष क्र. ९८२२० १६२९९ वर आपली मागणी नोंदवावी.