रत्नागिरी जिल्ह्यात ५६५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ : १५ जणांचे अहवाल ‘निगेटिव्ह’
-
कोरोना विषाणूचा (कोव्हीड-१९) वाढता प्रादुर्भाव !
-
औद्योगिक क्षेत्र पूर्णत: बंद रत्नागिरी नगर परिषदेकडून उपाययोजना
रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या अनुषंगाने जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात २३ जण निरीक्षणाखाली आहेत. आत्तापर्यंत २५ जणांची तपासणी करण्यात आली असून जिल्ह्यात एकूण ५६५ जणांना ‘होम क्वारंटाईन’ करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात भरती केलेले आणि कोरोनाग्रस्त असणार्या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या ४ जणांसह अन्य रुग्णांचे वैद्यकीय अहवाल प्राप्त झाले आहेत. या तपासणीत एकूण १५ रुग्णांचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आले आहेत.
जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र पूर्णत: बंद
रत्नागिरी तालुक्यातील मिरजोळे आणि झाडगाव, चिपळूण तालुक्यातील खेर्डी, दापोली येथील औद्योगिक क्षेत्रातील एकूण ९०८ उद्योगांपैकी ८९७ उद्योग बंद करण्यात आले आहेत. ११ उद्योग आवश्यक सेवांशी संबंधित असल्याने चालू आहेत. २२ उद्योगांनी अपरिहार्य कारणास्तव काम चालू ठेवण्याची अनुमती मागितली आहे.
नगर परिषदेकडून सर्वत्र जंतूनाशक फवारणी
कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदची आरोग्ययंत्रणा दक्ष झाली आहे. नगराध्यक्ष प्रदीप उपाख्य बंड्या साळवी यांनी शहरातील स्वच्छतेचा आढावा घेऊन आरोग्यविभागातून स्वच्छतेवर काम सुरू केले आहे. मुख्य रस्ते, बसथांबे शेड, सरकारी कार्यालय परिसर स्वच्छ करून पाण्याने स्वच्छ धुवून काढण्यात येत आहे. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रत्नागिरी नगर परिषदेने रस्त्यांवर सर्वत्र जंतुनाशक फवारणी चालू केली आहे. शहरात सर्वत्र ‘क्लोरीन गॅस’चा ‘हाय डोस’ असलेल्या पाण्याची फवारणी केली जात आहे. याशिवाय सर्वत्र डासविरोधक फवारणीही केली जात आहे.
१२ धुके (फॉग) यंत्रे नव्याने दाखल
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी नगर परिषदेकडे १२ धुके (फॉग) यंत्रे नव्याने दाखल झाली आहेत. याच यंत्राने प्रत्येक प्रभागात फवारणी करण्यास प्रारंभ झाला आहे. याशिवाय नगराध्यक्ष साळवी यांच्या आदेशानुसार १० सहस्र मास्क यापूर्वीच मागवण्यात आले असून त्याचे वाटप करण्यास प्रारंभ झाला आहे.