वर्तमानपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होत नाही ! – जागतिक आरोग्य संघटना
नवी देहली – वृत्तपत्रांमुळे कोरोना पसरण्याचा धोका अत्यंत अल्प आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. ‘एक अशी वस्तू जी अनेक ठिकाणी प्रवास करून आपल्यापर्यंत पोचते. म्हणजेच एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जातांना ती वस्तू वेगवेगळ्या तापमानामधून, परिस्थितीतून प्रवास करते. त्यामुळे अशा वस्तूंमुळे कोरोनाचा संसर्ग होण्याची शक्यता अत्यंत अल्प आहे’, असे या संघटनेने म्हटले आहे. ‘वृत्तपत्रांमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो’, असे वृत्त पसरल्याने या संघटनेने हे स्पष्टीकरण दिले आहे.
अमेरिकेतील एका वैद्यकीय संस्थेने सांगितले की, अनेकजण हाताळत असलेल्या वस्तूंपासून दूर रहाण्याचा सल्ला देण्यात येत आहे. त्यामुळे ‘वृत्तपत्रे आणि मासिके यांपासून लांब रहा’ असे सांगण्यात येत आहे; परंतु हा अपसमज असून तुमच्या घरी येणारे वृत्तपत्र पूर्णपणे सुरक्षित आहे. वृत्तपत्र निर्जंतुक केल्यानंतरच मुद्रणालयामधून वेगवेगळ्या शहरांमध्ये पाठवले जात आहे. तसेच छपाईसाठीचे यंत्र पूर्णपणे स्वयंचलित आहेत. त्यामुळे वृत्तपत्रांमुळे कोरोना विषाणू पसरत नाही, असे स्पष्ट झाले आहे.