हिंदूंची आणि अन्य पंथियांची कालगणना
हिंदूंची प्राचीन काळापासून चालत आलेली भारतीय कालगणना गुढीपाडव्यापासून चालू होते. वर्षातील प्रत्येक अमावास्येला चंद्र-रवि एकत्र येत असतात आणि पौर्णिमेस ते समोरासमोर येतात. चैत्र अमावास्येस चंद्र आणि रवि दोघेही मेष म्हणजे पहिल्या राशीत एकत्र असतात.
आपण दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापासून मानतो. ख्रिस्ती कालगणना दिवसाचा प्रारंभ मध्यरात्री बारा वाजल्यापासून मानते, तर इस्लामी कालगणना दिवसाचा प्रारंभ सायंकाळपासून मानते. आपला दिवस हा सूर्याच्या उदयासमवेत चालू होतो. त्यामुळे आपल्या दिवस प्रारंभास एक नैसर्गिक अधिष्ठान मिळालेले आहे. आपल्याकडे वाराच्या प्रारंभी त्या वाराच्या देवतेचा पहिला ‘होरा’ असतो. ‘होरा’ म्हणजे ६० मिनिटे म्हणजेच अडीच घटका. प्रत्येक घटका २४ मिनिटांची म्हणूनच अडीच घटकांचा १ घंटा. या घंट्याला इंग्रजीत ‘आवर’ (HOUR) म्हणतात. तो शब्द ‘होरा’वरूनच आलेला आहे. ‘होरा’ म्हणजे अहोरात्र या चार अक्षरी शब्दातील मधली दोन अक्षरे. सहस्रो वर्षांपासून प्रचलित असलेल्या आपल्या कालगणनेने खगोलीय चंद्र-सूर्याच्या स्थितीची सूक्ष्मता अधिकाधिक सांभाळण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणूनच गुढीपाडवा हा एक प्रकारे आपल्या अभिमानाचा विषय आहे. – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (‘देवाचिये व्दारी’ पुस्तकामधून)