गुढीपाडव्याची प्राचीनता सांगणार्या काही कथा
नारद मुनींना ६० मुलगे झाले. प्रत्येक मुलाचा जन्म चैत्र शुद्ध प्रतिपदेलाच झाला आणि प्रत्येक मुलाच्या जन्माच्या वेळेस देवांनी गुढ्या-पताका उभारून आनंदोत्सव साजरा केला. त्या वेळेपासूनच या नवीन संवत्सराचे स्वागत करतांना घराबाहेर एक उंच गुढी उभारण्याची परंपरा चालू झाली. बांबूची म्हणजे कळकाची एक लांब काठी आणून तिच्यावर रेशमी वस्त्र गुंडाळून, चांदीचे, तांब्याचे अथवा पितळेचे भांडे उपडे ठेवून तिला फुले वाहून काठी घराच्या छपराबाहेर उंच उभारणे म्हणजेच गुढी उभारणे होय. ब्रह्मदेवाने गुढीपाडव्याच्या दिवशी सगळे जग निर्माण केले आणि कालगणनाही चालू केली, अशी श्रद्धा आहे. काही ठिकाणी विशेषत: मराठवाड्यात शेवग्याची लांब काठी आणून तिला तेल लावून पाण्याने न्हाऊ घालायचे आणि त्या काठीवर गुढी उभारावयाची अशीही प्रथा असल्याचे सांगतात.
महाभारतातील कथा
महाभारतात एक कथा आहे. चेदी राजा वसू जंगलात गेला आणि त्याने कठोर तप आरंभले. देव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी वसूला यशोदायी अशी वैजयंतीमाला दिली, तसेच अखंड भ्रमंतीसाठी एक विमान अन् राज्यकारभार चालू करण्यासाठी राजदंडही दिला. या दैवी प्रसादाने वसू आनंदित झाला आणि भारावूनही गेला. त्याने त्या राजदंडाच्या एका टोकाला जरीचे रेशमी वस्त्र ठेवून त्यावर सोन्याचा चंबू बसवला आणि त्याची पूजा केली. हेच आजच्या गुढीचे मूळ स्वरूप म्हटले पाहिजे. हा वर्षप्रतिपदेचा उत्सव नव्या वर्षाचा प्रारंभ करणारा असल्यामुळे हा दिवस आनंदात घालवला की, पुढील वर्ष आनंदात जाते, अशी श्रद्धा आहे. – ज्योतिर्भास्कर जयंत साळगांवकर (‘देवाचिये व्दारी’ पुस्तकामधून)