चैत्र शुक्ल पक्ष प्रतिपदेस वर्षारंभ करण्याची नैसर्गिक, ऐतिहासिक आणि आध्यात्मिक कारणे
१. नैसर्गिक
ज्योतिषशास्त्रानुसार पाडव्याच्या आसपासच सूर्य वसंत-संपातावर येतो (संपात बिंदू म्हणजे क्रांतीवृत्त आणि विषुववृत्त ही दोन वर्तुळे ज्या बिंदूत परस्परांस छेदतात तो बिंदू होय.) अन् वसंत ऋतू चालू होतो. सर्व ऋतूंत ‘कुसुमाकरी वसंत ऋतू ही माझी विभूती आहे’, असे भगवंताने श्रीमद्भगवद्गीतेत (अध्याय १०, श्लोक ३५) म्हटले आहे. या वेळी समशीतोष्ण अशी उत्साहवर्धक आणि आल्हाददायक हवा असते. शिशिर ऋतूत झाडांची पाने गळून गेलेली असतात, तर पाडव्याच्या सुमारास झाडांना नवी पालवी येत असते.
२. ऐतिहासिक
या दिवशी
अ. रामाने वालीचा वध केला.
आ. शकांनी हुणांचा पराभव करून विजय मिळवला.
इ. या दिवसापासूनच ‘शालिवाहन शक’ चालू झाले; कारण या दिवशी शालिवाहनाने शत्रूवर विजय मिळवला.
३. आध्यात्मिक
ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली, म्हणजे सत्ययुगाला प्रारंभ झाला, तो हा दिवस असल्याने या दिवशी वर्षारंभ केला जातो.