स्पेनमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांचे मृतदेह अनेक घरांमध्ये पडून !
गंभीर आजारी असलेल्या वृद्धांना बेवारस सोडले !
- स्पेनमधील ही स्थिती पाहून भारतियांनी या साथीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकार आणि प्रशासन यांना साहाय्य केले पाहिजे. यातून काहीही न बोध घेता भारतीय समाज निष्काळजीपणे वागत राहिला, तर भारतात स्पेनपेक्षा अधिक वाईट स्थिती येईल, हे भारतियांनी लक्षात ठेवावे !
- स्पेनमधील ही स्थिती पाहून ‘आपत्काळ काय असतो’, हे आता भारतियांनी लक्षात घ्यावे आणि आतापासून त्याला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हावे !
माद्रीद (स्पेन) – स्पेनमध्ये कोरोनामुळे २ सहस्र ६९६ रुग्णांचा मृत्यू झाला, तर ४० सहस्रांहून अधिक लोकांना त्याची लागण झाली आहे. अनेक घरांमध्ये मृतदेह पडून असून ते हटवण्यासाठी सैन्याचे साहाय्य घेतले जात आहे. कोरोनाच्या भीतीमुळे गंभीर आजारी असलेल्या वयोवृद्धांना बेवारस सोडण्यात आले आहे. काही घरांत अनेक दिवसांपासून मृतदेह पडून आहेत; परंतु कोरोनाच्या भीतीमुळे कुणीही घरात प्रवेश करण्यास सिद्ध नाहीत. सैनिक अशा घरांमध्ये जाऊन मृतदेह उचलत आहेत.
स्पेनचे संरक्षणमंत्री म्हणाले की, सैनिक काही घरांत पोचले असता अनेक वृद्ध आजारी असून ते जिवंत आढळले; मात्र त्यांना त्याच स्थितीत एकटे सोडण्यात आले आहे. ‘२० टक्के वृद्धांमुळे ‘केअर होम्स’मध्ये (वृद्धाश्रमामध्ये) कोरोनाचा प्रादुर्भाव होतो’, असे सांगण्यात येत आहे’, अशी माहिती त्यांनी दिली.
स्पेनमध्ये कोरोनाची साथ इटलीपेक्षाही वेगाने पसरत आहे !
स्पेनमध्ये मागील २ आठवडे दळणवळणावर बंदी घालण्यात आली आहे. स्पेनमध्ये या साथीमुळे मागील २४ घंट्यांमध्ये ४६२ लोकांचा मृत्यू झाला आहे. ‘इटलीपेक्षाही स्पेनमध्ये कोरोनाची साथ झपाट्याने पसरत आहे’, असे तज्ञांचे मत आहे. या पार्श्वभूमीवर स्पेनमध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी अनिश्चित काळासाठी वाढवण्यात आली आहे. सरकारने घातलेल्या निर्बंधांचे उल्लंघन करणार्यांना दंड ठोठावण्यात येत आहे.