कारवाईसाठी पोलिसांना संपूर्ण स्वातंत्र्य ; जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवणार ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
मुंबई – कोरोनाच्या प्रतिबंधासाठी लागू केलेल्या राज्य आणि जिल्हा प्रवेशबंदी अन् संचारबंदी यांसारख्या निर्णयांवर कठोर कार्यवाही करण्यात येईल. त्यासाठी पोलिसांना कारवाईचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आले आहे. भाजीपाला, फळे, दूध, अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खरेदीसाठी गर्दी करू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला केले आहे. ‘कोरोनाच्या धोक्यापासून दूर रहाणे, हे प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. त्याप्रमाणे स्वत:चे वर्तन ठेवावे आणि संयम पाळून शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करावे’, असे आवाहनही त्यांनी केले आहे.