जीवनाचे गुह्य ज्ञान शिकवणारी गुढी !
१. प्रत्येक क्षणाला सतर्कतेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे, हे ‘प्रतिपदा’ दर्शवते !
‘जीवनात काय साध्य करायचे आहे, याचे गुढी हे प्रतीक आहे. गुढीपाडवा चैत्र मासाच्या प्रथम दिवशी येत असल्याने त्या दिवसाला ‘प्रतिपदा’ म्हटले आहे. प्रत्येक पाऊल आणि क्षण ईश्वरप्राप्तीसाठी घालवण्यासाठी अन् समर्थपणे पुढे जाण्यासाठी प्रत्येक क्षण मौल्यवान आहे. त्याचे मूल्य समजण्यासाठी प्रत्येक क्षणाला संधी मिळते. ‘ते जाणून जीवन जगले पाहिजे’, हे प्रतिपदा सांगते.
गुढीपाडव्याच्या दिवशी आपण मिळालेल्या संधीचा उपयोग करून घेऊया. ध्येयाच्या दृष्टीने वाटचाल करतांना प्रत्येक क्षणी त्या दृष्टीने समर्थतेने पाऊल टाकणे, म्हणजे प्रतिपदा ! मृत्यू कधी येईल, हे सांगता येत नाही. प्रतिपदा म्हणजे प्रत्येक क्षणाला सतर्कतेने आपल्या ध्येयाकडे वाटचाल करणे. प्रतिपदा म्हणजे प्रत्येक क्षणी जागृत रहाणे.’
२. कडूलिंबाचे सामर्थ्य
गुढीला कडूलिंब का लावतात ? कडूलिंब हा कडू असला, तरी तो गुणकारी आहे. सत्य हेसुद्धा कडू असते. यासाठी गुढीला ते लावतात. हा वनस्पतीचा सत्कार आहे.
आयुर्बलं यशो वर्चः प्रजाः पशुवसूनि च ।
ब्रह्म प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ॥ – अश्वत्थस्तोत्र, श्लोक १२
अर्थ : हे वनस्पते, तू आम्हाला आयुष्य, बळ, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रह्माला जाणण्याची अन् आकलन करण्याची तेजस्वी बुद्धी दे.
अशा प्रकारे ‘वनस्पतीमध्ये किती सामर्थ्य आहे’, हे दिसून येते. तिचा सत्कार होण्यासाठी तिला या सणाच्या दिवशी महत्त्व दिले जाते.
३. कलश हे ज्ञानशक्तीचे प्रतीक असणे
गुढीवर उलटा लावलेला कलश (तांब्याचा तांब्या), हा ज्ञानशक्तीचे प्रतीक आहे. तो कळस (शिखर) आहे. ते गाठणे म्हणजे यशस्वी होणे होय.
४. गुढी म्हणजे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक
गुढी हे त्यागमय जीवन जगण्याचे प्रतीक आहे. पुतळे उभारणे, हे प्रतीक आहे. ते जाज्वल्य असले पाहिजे. त्या प्रतीकाकडे किंवा आवरणाकडे न पहाता त्यातील चैतन्यशक्ती पाहिली पाहिजे. त्यासाठी गुरूंकडून ज्ञान, म्हणजे दीक्षा घेतली पाहिजे. त्याने शिक्षा दिली पाहिजे, म्हणजेच आवरण काढले पाहिजे. त्यासाठी प्रायश्चित घेतले पाहिजे.
प्रायश्चित ही शिक्षा आहे. ‘शिक्षा’पासून शिक्षण शब्द झाला आहे. त्यासाठी शिक्षक, परीक्षण, परीक्षा, कक्षा इत्यादी ‘क्ष’ने भरलेले शब्द आहेत. त्यानंतर तो उत्तीर्ण होण्याला ‘समावर्तन क्रिया’ म्हणतात. म्हणजे ‘आवरण काढून समेवर आणणे होय.’ हा शेवट आहे.
५. संसार समत्व बुद्धीने आणि समभावाने पहायला शिकले पाहिजे !
संसार म्हणजे समेचा सार ! तो समत्व बुद्धीने आणि समभावाने पहायला शिकले पाहिजे. ‘समत्वं योग उच्यते’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ४८) म्हणजे ‘समभावालाच ‘योग’ असे म्हणतात’, असे गीतेत म्हटले आहे.
६. गुढी उभारतांना बांबू का वापरतात ?
बांबू हे सुषुम्ना नाडीचे प्रतीक असून त्यातून शरिरात सर्वत्र चैतन्यशक्ती (कुंडलिनी शक्ती) कार्य करते. तिची आराधना करून आणि ती जागृत होऊन त्याद्वारे कार्य करण्यासाठी तिला आवाहन करणे, यासाठी ही पूजा केली जाते. त्या शक्तीला सजवले जाते; म्हणून बांबूला वस्त्र नेसवले जाते.
भागवतात अध्याय ५ मध्ये धुंधुक्कारी आणि गोकर्ण यांची कथा आहे. हे दोघे भाऊ असतात. धुंधुक्कारी वाईट वृत्तीचा असतो. वाईट संगतीला लागल्याने त्याच्याकडून पाप होते. मृत्यूनंतर तो भयंकर योनीत जातो. गोकर्ण साधना करण्यासाठी वनात गेलेला असतो. तो परत येतो, तेव्हा मृत्यू पावलेला धुंधुक्कारी त्याला विविध रूपे धारण करून त्याचा उद्धार करण्यास विनवतो. गोकर्ण त्याच्यासाठी भागवताची कथा आरंभ करतो. कथा ऐकण्यासाठी तो वायुरूप होऊन तेथे असलेल्या बांबूच्या खालच्या पेरात जाऊन बसतो. गोकर्णचा जसजसा एक-एक अध्याय पूर्ण होत गेला, तसतसे बांबूचे एक-एक कांडे भंग होत गेलेे. अशा प्रकारे सात दिवसांच्या भागवत पारायणाने धुंधुकारीचे सर्व भोग नष्ट झाले.
वरील कथेवरून बांबूचे महात्म्य लक्षात येते. जिवाच्या उद्धारासाठी सुषुम्ना नाडी शुद्ध असणे आवश्यक आहे. त्यामुळे तो जीव शुद्ध होतो; हे सामर्थ्य आणि हे गुह्य ज्ञान या भागवतातील गोष्टीवरून लक्षात येते.
अशा प्रकारे गुढीचे महत्त्व महान आहे. जीवनाचा आदर्श असलेली गुढी आपल्याला आपल्या जीवनाचे गुह्य ज्ञान दाखवते.’
– (परात्पर गुरु) परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२८.३.२०१७)