…तर अशा चित्रपटांवर बहिष्कार हा उत्तम पर्याय !
काही दिवसांपूर्वी जवाहरलाल नेहरु विद्यापिठात (जेएन्यू) झालेल्या हिंसक आक्रमणानंतर अभिनेत्री दीपिका पदुकोण या आंदोलकांच्या भेटीसाठी जेएन्यूमध्ये गेल्या होत्या. या वेळी दीपिका पदुकोण यांनी जेएन्यू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आयशी घोष यांची विचारपूस केली आणि काहीही न बोलता त्या निघून गेल्या. वास्तविक जेएन्यूमध्ये साम्यवादी गटातील विद्यार्थ्यांनीच हिंसक आक्रमण करून साहित्यांची तोडफोड केली आहे, असे पोलीस अन्वेषणात समोर आले. आतापर्यंत जेएन्यूमधील साम्यवादी गटाच्या विद्यार्थ्यांनी देशद्रोह्यांसारखीच कृती केली आहे. असे असतांना दीपिका पदुकोण या आक्रमण करणार्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्यानंतर देशभरात संतापाची लाट पसरली. यानंतर सामाजिक माध्यमांतून दीपिका पदुकोण यांच्यावर टीका होऊ लागली. याचा थेट आणि मोठा परिणाम दीपिका पदुकोण यांच्या ‘छपाक’ या चित्रपटावर आणि त्यांनी केलेली विज्ञापने यांवर मोठ्या प्रमाणात झाला.
दीपिका पदुकोण यांना विज्ञापनात घेणार्या आस्थापनांनी कमालीची धास्ती घेतली. अनेक ब्रॅण्ड्सनी दीपिका यांची विज्ञापने २ आठवड्यांसाठी थांबवण्याचा किंवा अल्प दाखवण्याचा निर्णय घेतला. सामाजिक माध्यमांतून दीपिका यांच्या विरोधात ट्रोलर्सनी वादळ उठवले. ‘बॉयकॉट दीपिका’, ‘बॉयकॉट छपाक’ असे हॅशटॅग ट्रेण्ड केले. ‘टुकडे-टुकडे गँगची अॅम्बॅसेडर’ अशीही उपमा दिली. त्याचा परिणाम बॉक्स ऑफिसवरही दिसला. याचवेळी अभिनेता अजय देवगण यांचा ‘तान्हाजी’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांनी ‘छपाक’ चित्रपटाकडे पाठ फिरवत ‘तान्हाजी’ चित्रपटाला अधिक पसंती दिली, एवढेच नव्हे, तर प्रेक्षक आणि समीक्षक यांच्याकडून या चित्रपटाचे कौतुक केले गेले. ‘देशद्रोह्यांना पाठिंबा देणार्या कलाकारांचे चित्रपट आम्ही पाहणार नाही. त्यापेक्षा देशाच्या संरक्षणासाठी प्राणाची बाजी लावून हुतात्मा झालेले ‘तान्हाजी मालसुरे आणि मावळे’ यांचा ‘तान्हाजी’ हा चित्रपट आम्ही नक्कीच पाहणार आहोत’, अशा प्रतिक्रिया प्रेक्षकांनी दिल्या आहेत. ‘छपाक’ चित्रपटाच्या तुलनेत ‘तान्हाजी’ चित्रपटाने चांगली कमाई केली आहे.
अभिनेता आमीर खान यांनी ‘पीके’ चित्रपटात हिंदु धर्मातील देवतांचे विडंबन केले होते. ‘ओ माय गॉड’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार आणि परेश रावल यांनी संत अन् देवता यांचे विडंबन केले आहे. त्यामुळे यांच्या चित्रपटांवर लोकांनी बहिष्कार घालायला हवा होता; मात्र दुर्दैवाने तसे झाले नाही. आता मात्र राष्ट्रप्रेमी लोकांमध्ये कोणत्या चित्रपटांना पसंती द्यायची अथवा बहिष्कार घालायचा याविषयी जागृती होत आहे, असे म्हणण्यास वाव आहे. कलाकाराची विज्ञापने थांबवण्याची किंवा अल्प दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही. अभिनेता आमीर खान यांची विज्ञापनेही बंद केली होती. स्नॅपडीलसारख्या आस्थापनाला आमीर खान यांच्या वादाचा सर्वांत मोठा फटका बसला, तर ‘माय नेम इज खान’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळी शाहरुख खान यांच्या ‘ब्रॅण्ड व्हॅल्यू’ला धक्का लागला होता. तेव्हाही आस्थापनांनी वादात अडकलेल्या प्रत्येक अभिनेत्यापासून फारकत घेतली. त्यामुळे कलाकारांच्या विज्ञापनांवरही लोकांनी बहिष्कार टाकून ती उत्पादने विकत घेऊ नयेत. आस्थापनांचे मालक अशा कलाकारांना विज्ञापनांमध्ये घेणे बंद करतील. काही चित्रपट अभिनेते, अभिनेत्री केवळ पैसा आणि प्रसिद्धी यांसाठी हिंदु धर्म, तसेच देवता, राष्ट्रपुरुष यांचे विडंबन करून देशद्रोह्यांना पाठिंबा देत आहेत. ‘मी काहीही करीन, बोलीन, मला जाब विचारणारा कोण आहे ?’ अशा धुंदीत हे कलाकार वावरत आहेत. एखादा चित्रपट कलाकार किंवा निर्माता धर्म अन् देश यांच्या विरोधात कृती करत असेल, तर त्यावर लोकांनी संघटितपणे बहिष्कार घालणे हा असे प्रकार रोखण्यासाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे चित्रपटाचे निर्माता, दिग्दर्शक, कलाकार आणि आस्थापने देशाच्या हिताला बाधक अशी कृत्ये न करण्याविषयी शहाणे होतील !
– श्री. सचिन कौलकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.